वडिलांचे निधन झालेले तरीही धीरोदात्तपणे आधी 12 वीचा पेपर दिला, मग वडिलांवर अंत्यसंस्कार केल्याची हृदयद्रावक घटना मुरगूड येथे घडली.येथील शिवराज ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 वी विज्ञान शाखेत शिकणारा गणेश महादेव कांबळे याचे वडील महादेव गणपती कांबळे (वय 64) यांचे गुरुवारी सकाळी कोल्हापुरात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव— झटक्याने निधन झाले.
Satara : सातारा जिल्ह्यात वातावरणात बदल, कराडला पावसाची रिपरिप सुरू
यामुळे कुटुंबीय हादरून गेले. त्यांचा मुलगा गणेश हा बारावी परीक्षेच्या पेपरला जात असतानाच तो या घटनेने गर्भगळीत झाला. पेपर सुरू झाला; पण गणेश कांबळे आला नव्हता. वर्ग शिक्षक उदय शेटे यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता गणेश पेपर देण्याच्या मनःस्थितीत नव्हता. वर्गशिक्षक उदय शेटे तसेच अमर पवार, राजू कांबळे यांनी गणेशची भेट घेऊन त्याचे सांत्वन करत समजूत काढली. हृदयावर दगड ठेवून तो परीक्षेसाठी आला. त्याने शांतपणे पेपर सोडवला. महादेव कांबळे हे मुरगूड पालिकेकडे रोजंदारीवर सफाई कामगार होते.
मुलाची परीक्षा पूर्ण होण्यासाठी तिकडे कोल्हापुरातील इस्पितळात वडील महादेव कांबळे यांचा मृतदेह तब्बल तीन तास थांबवून ठेवण्यात आला. गणेश परीक्षा देऊन बाहेर पडताच कोल्हापूरहून आणलेल्या वडिलांच्या पार्थिवावर कोसळत गणेश धाय मोकलून रडू लागला. त्यामुळे सर्वांनाच गहिवरून आले. शोकाकूल वातावरणात गणेशच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.