ताजी बातमी ऑनलाईन टीम
हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. ‘सीएनबीसी’च्या रिपोर्टनुसार कंपनीने ब्रू कॉफीचे दर तीन ते सात टक्क्यांनी वाढवले आहेत. ब्रू गोल्ड कॉफीच्या प्रती पॅक मागे तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर ब्रु इन्स्टंट कॉफी पाऊचीच किंमत सहा टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. एवढेच नाही तर कंपनीने चहाच्या (TEA) किमतीमध्ये देखील वाढ केली असून, ताजमहाल चहाच्या किमतीमध्ये 3.7 ते 5.8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर ब्रूक बॉंड टीची किंमत तब्बल 14 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. भाववाढीबद्दल कंपनीकडून खुलासा देखील करण्यात आला आहे. कच्चा माल महाग झाला आहे, तसेच मनुष्यबळ देखील महागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या किमतीमध्ये उत्पादनाची विक्री करणे परवडत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
फेब्रुवारी महिन्यात दोनदा दरवाढ
फेब्रुवारी महिन्यात हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या विविध उत्पादनामध्ये दोनदा दरवाढ केली होती. त्यामध्ये डिटर्जंट पावसडर आणि साबनाचा समावेश होता. या उत्पादनामध्ये 9 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. हिंदुस्थान युनिलिव्हरने फेब्रुवारी महिन्यात लाईफबॉय, लक्स आणि पीयर्स या साबनाचे भाव वाढवले होते. त्यासोबतच कम्फर्ट फॅब्रिक कंडीशनर, डव्ह बॉडी वॉशचे देखील दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता कंपनीने कॉफी आणि चहाच्या किमतीमध्ये वाढ केली आहे.
कच्चा माल महागला
उत्पादनाचे दर वाढवण्यात आले आहेत, याबाबत हिंदुस्थान युनिलिव्हरकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आले आहे. दिवसेंदिवस कच्चा माल महाग होत आहे. मनुष्यबळ देखील महागले आहे. त्यामुळे उत्पादनाचा निर्मिती खर्च वाढला आहे. निर्मिती खर्च वाढल्याने जुन्या दरात कंपनीला वस्तू विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे उत्पादनाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. सोबतच सध्या युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाल्याचे कंपनीने सांगितले.