बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी चित्रपट ‘रनवे 34’ची टीझर रिलीज झाला आहे. सलमान खानने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हा टीझर (‘Runway 34’ Teaser) शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्याकडे कोणताही चित्रपट तयार नाही. त्यामुळे मी माझा भाऊ अजय देवगणला विनंती केली आहे, तो ईदी द्यायला येऊ शकतो. चला ही ईद साजरी करूया आणि पाहूया #Runway34′. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे.
अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा या वर्षातील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. हा सत्य घटनांवर आधारित थ्रिलर ड्रामा मूव्ही आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत रकुल प्रीत सिंग आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे मोठे स्टार दिसणार आहेत. 48 सेकंदांच्या या टीझरमध्ये सुरुवातीला मुसळधार पाऊस आणि खराब हवामानात एक विमान उडताना दिसते. त्यानंतर या विमानाला काहीतरी अडचण आल्याचे लक्षात येते. चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा टीझर आहे.
टीझरमध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह विमान उडवताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून ते कुठल्यातरी मोठ्या संकटात अडकले आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. यादरम्यान अजय देवगणला अमिताभ बच्चन यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आठवतात. अवघ्या 48 सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.