उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्त्व करण्यास सज्ज झाले आहे. योगी आदित्यनाथ होळीनंतर लगेचच 21 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. दुसरीकडे राज्यात किती उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळात कोण-कोण असेल, यावर संध्या दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात (BJP) खलबते सुरू आहे. योगी सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद आणि कोणाला डच्चू मिळेल, याबाबत भाजपने आधी फॉर्म्युला तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेली माहिती अशी, की जातीय-प्रादेशिक समीकरण, महिला-युवावर्गाला लक्षात योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे. दिल्लीतील भाजप हायकमांडने योगी मंत्रिमंडळातील संभाव्या मंत्र्यांची यादी तयार केली आहे. जितकी मतांची संख्या जास्त, तितका मोठा वाटा, हे धोरण समोर ठेऊन विजयी उमेदवारांना मंत्रिपद दिले जाणार आहे. यासोबतच यावेळीही मंत्रिमंडळात बडे चेहरे पाहायला मिळणार आहेत. परंतु खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. त्यांच्या ऐवजी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
योगी मंत्रिमंडळ स्थापण करण्यासाठी दिल्लीतील मुख्यालयात बुधवारी बोलावण्यात आलेली हायकमांडची बैठक तब्बल साडेचार तास चालली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महामंत्री संगठन बीएल संतोष, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा आणि महामंत्री संगठन सुनील बंसल यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री, कॅबिनेट, राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि राज्यमंत्र्यांच्या नावांवर मंथन करण्यात आले.