Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीKolhapur : तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं?, चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटील यांना...

Kolhapur : तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं?, चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटील यांना सवाल

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज बुधवारी सत्यजित कदम यांनी भाजपकडून उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जाताना दसरा चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर निशाणा साधला. सत्यजित उर्फ नाना कदम यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जाताना प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतं की, भाजप या पोटनिवडणुकीत विजयी होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

”माझ्या विरोधकांनी १६ महिन्यांपूर्वीची माझी क्लिप शोधून काढली. वारंवार हे कोल्हापुरातून निवडून येऊ शकलो नाहीत म्हणून पुण्याला पळाले होते, यावर मी म्हटलं हो…कोल्हापूर जिल्ह्यातील एकातरी आमदाराने राजीनामा द्यावा. आपली जागा मोकळी करुन द्यावी. मी पोटनिवडणूक लढवतो. त्यानंतर कोण विजयी होतो ते बघुया. जर विजयी नाही झालो तर हिमालयात जाईन असं मी म्हटलो होतो. पण तुम्ही पण (बंटी पाटील यांनी) असं म्हटलं होतं, की या शहराला थेट शुद्ध पाणी मिळालं नाही तर विधानसभा लढवणार नाही. त्यांनी आता जनतेला जाब द्यावा की थेट पाईपलाईनंच पाणी कुठे आहे. आमदार झालात, मंत्री झालात.” असे म्हणत पाटील यांनी जोरदार टीका केली.

हसन मुश्रीफ यांनी असं म्हटलं होतं की, या दिवाळीला पाणी नाही आलं तर मी वाटेल ते…पण दिवाळी गेली पाणी नाही आलं, अशा शब्दांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ही निवडणूक चंद्रकांत पाटील विरुद्ध बंटी पाटील आणि बंटी पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक अशी केली जात असली तरी आम्ही विकासावर निवडणूक लढवणार आहोत, असे पाटील म्हणाले.

५० वर्षे तुमचं महाराष्ट्रात राज्य होतं. दहा वर्षे आमचं राज्य होतं. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० वर्षात काय केलं ते सांगा. आम्ही ५ वर्षात काय केलं याची यादी देतो. कोल्हापूर विमानतळावरुन खासगी विमान उडणं अवघडं होतं. ८० कोटी रुपये देऊन आम्ही विमानतळाचा विस्तार केला. अंबाबाईच्या मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -