जलगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी गावाजवळ ट्रकच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी ठार झाला. या घटनेनंतर घटनास्थळी संतप्त जमावाकडून ट्रकवर दगडफेक करण्यात आली.
चौथीच्या वर्गात सेंट टेरेसा शाळेत शिकणारा सुजय गणेश सोनवणे (वय 13) हा राजु गवळी यांच्या मोटार सायकलवर (एमएच 19 डीएम 111) डबलसीट बसून आज दुपारी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. याप्रसंगी गावाजवळ असलेल्या उताराजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रकचालकाने लागलीच पलायन केले. मयत सुजय यास तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
दरम्यान, मयत सुजय हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे पुत्र गणेश सोनवणे यांचा पुत्र होता. यामुळे सोनवणे कुटुंबावर वज्राघात झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे.