राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना दिल्लीत दहशवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजधानीत पोलिसांकडून रात्रगस्त वाढवण्यात आल्याचे कळतेय.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांना दहशतवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान’कडून एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. जो उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पाठवला आहे.त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सरोजनी नगर मार्केट परिसरासह इतरत्र गस्त वाढवली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी, सर्व प्रकारच्या सेवा,बाजारपेठा सुरु आहेत.आवश्यक तेथे पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनाही काही संशयास्पद आढळले तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे माहिती समोर आली आहे.