ताजी बातमी ऑनलाईन टीम
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याचे कारण समोर करत मोदी सरकारकडून महागाईने पिचलेल्या जनतेवर पेट्रोल दरवाढीचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच आहे. पेट्रोलची आता सव्वाशेकडे वाटचाल सुरु झाली असून डिझेलने सुद्धा दिमाखात शतक साजरे केले आहे.
गेल्या ९ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीमध्ये तब्बल सहाव्यांदा वाढ झाली आहे. राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर ११५.८८ रुपयांवर, तर डिझेलचा प्रती लिटर दर १००.१० रुपयांवर गेला आहे. आज अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची वाढ झाली आहे. निवडणूक पार पडताच दरवाढीचा चटका देण्यास सुरुवात झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये आता पेट्रोलने शंभरी पार केली आहे. त्या ठिकाणी आता १०१.०१ रुपये प्रती लिटर दर झाला आहे, तर डिझेलचा दर ९२.२७ रुपयांवर पोहोचला आहे.
पेट्रोल आणि डिझेलची देशव्यापी दरवाढ होत असून राज्यांमधील कर रचनेवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तफावत आहे. स्थानिक करांसह पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित होते. गेल्या साडे चार महिन्यात तब्बल ९ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमतीमध्येही ५० रुपयांची दरवाढ यापूर्वीच झाली आहे.