चित्रपटसृष्टीत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करणार्या एका तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अश्लिल व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी या तरुणीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अमित प्रेमचंद सिटलानी (वय ४०, रा. मधुबन सोसायटी, कळस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०१७ पासून २६ मार्च २०२२ पर्यंत सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॅक स्टेज ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून करते. अमित सिटलानी हा कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करतो. एका मित्राच्या ओळखीतून दोघांची ओळख झाली होती.अमित सिटलानी याने फिर्यादी यांना मे २०१७ मध्ये टिंगरेनगर येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी नेले. तेथे त्याने फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. त्याने याचा अश्लिल व्हिडीओ बनवला होता.
त्यानंतर २०१८ पासून त्याने हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना तो वेगवेगळ्या हॉटेलवर बोलावायचा. इस्ट फिल हॉटेल, विमाननगर व स्काय व्हिस्टा हॉटेल, खराडी येथे घेऊन जाऊन फिर्यादी यांच्याशी त्याने जबरदस्तीने शारिरीक संबंध ही ठेवले. यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
अमित सिटलानी याने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला वारंवार धमकी दिली. माझे इतके हजार फॉलोअर्स आहे, तुझी सर्व इंडस्ट्रीत बदनामी होईल अशी धमकी तो तीला वारंवार देत होता. या सर्व प्रकारामुळे घाबरुन तिने आजवर कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता.
२६ मार्च रोजी त्याने तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार केला. शिवीगाळ करुन तिला मारहाण केली. सततच्या या अत्याचारामुळे तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.