देशात आज नवीन आर्थिक वर्षाला आणि नवीन मराठी वर्षालाही सुरुवात होतेय. या नवीन वर्षात सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत आणि लोकांच्या फायद्याचे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. महागाई सर्वत्र असताना मात्र आज दिलासा देणारी बातमी आली आहे. यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल.
मुंबईसारख्या ठिकाणी नव्या वर्षात लोकांना काही वीज कंपन्यांकडून आर्थिक भार सोसावा लागू शकतो तर काहींना फायदा होऊ शकतो. नव्या आर्थिक वर्षामध्ये राज्यात काही वीज कंपन्यांचे वीजदर (Electricity Rate) कमी करण्यात आले आहेत.
राज्यात सर्वाधिक वापरली जाणारी वीज सेवा म्हणजेच महावितरणचे (Mahavitaran) वीज दर हे 2 टक्क्यांनी कमी केले जाणार आहेत, अशी माहीती आहे. यामुळे ग्राहकांना सगळीकडे होणारी दरवाढी पाहता वीजेचा वापर करण्यास जरासा फायदा होणार आहे. अर्थात वीजेच्या वापरानुसार तुमचं बिल ठरत असतं, मग त्यानुसार तुमच्या हातात आहे की बिल किती आणायचं ते! पण नव्या दरामुळे ग्राहकांना निश्चित फायदा होणार आहे.
यासोबतच आजपासून लागू होणाऱ्या नव्या वीज दराप्रमाणे टाटाच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये अनेक ग्राहक असलेले टाटाचे वीजदर 4 टक्क्यांनी कमी होणार असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे.
अदानीच्या वीजग्राहकांच्या बिलात युनिटमागं 1 ते 6 पैशांची वाढ होणार आहे. त्यामुळं महिन्याचे बिल अंदाजे 30 रुपये वाढणार आहे. याशिवाय बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार आहेत. अदानीची घरगुती ग्राहकांच्या तुलनेत व्यावसायिक वापर आणि औद्योगिक वापर असलेल्या वीज ग्राहकांची बिले मात्र कमी होणार असून, त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे.