ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे.
रोज हनुमान चालिसा वाजणार
दिवसभर हनुमान चालिसा लावण्यात येणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा आदेश. मनसे कार्यकर्ता म्हणून आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून सुरूवात केली आहे. रोज भोंगे वाजणार आहेत. त्यावर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीची आरतीसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या या ठिकाणी वाजणार आहेत. तणाव कशाला होणार? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्याने तणाव झाला का? नाही ना? हिंदू धर्माची आरती वाजली तर तणाव का? असा प्रश्नच का? आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो, असं मनसेचे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी सांगितलं.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल केला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? असा सवाल त्यांनी केला होता. मी कोणत्याही प्रार्थनेविरोधात नाही. तुम्ही तुमची प्रार्थना जरूर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको. युरोपात तरी कुठे भोंगे आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.