मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्याचे मोठे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरे याना अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी अबू आझमी यांनी आज शरद पवारांची भेटही घेतल्याचे समजत आहे.
राज ठाकरे सारख्या नेत्याची काही औकात नाहीये. ज्यांचे आमदार नाहीयेत. ते मनाला वाटेल ते बोलतात, मुळातच ज्या पक्षाला फार महत्व दिलं जात नाही. ज्यांना जनाधार नाही. अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकावं? अशा नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करुन वातावरण अशांत करणं योग्य नाही. राज ठाकरे यांना अटक करुन जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे”, असं अबू आझमी म्हणाले.
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्याच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. “ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.