Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरजातीयवादाला कोल्हापुरात थारा नाही : अजित पवार

जातीयवादाला कोल्हापुरात थारा नाही : अजित पवार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जाती-धर्मात फूट पाडणार्‍या व आरक्षणाला विरोध करत दंगली पेटविणार्‍या प्रतिगामी शक्तींना कोल्हापूरकर कधीच थारा देणार नाहीत, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.


कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या राजारामपुरी येथील प्रचार सभेत ते शुक्रवारी बोलत होते. भर पावसातही सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र यावे लागले. कोरोना, चक्रीवादळ, महापूर अशा संकटातही सामान्यांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतली. त्यांच्यासाठी राज्याची तिजोरी खुली केली, असे सांगून पवार म्हणाले, देशाला समतेचा विचार देणारी कोल्हापूरची भूमी आहे. राजर्षी शाहू छत्रपती यांच्या पुरोगामी विचाराने महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. परंतु काही मंडळींना हे बघवत नाही. भोंगे काढा म्हणणार्‍यांना हे आताच का सुचले, असा सवाल करून त्यांनी पाच वर्षे त्यांची सत्ता होती तेव्हा यांना कोणी अडविले होते काय, अशी विचारणा करत कोल्हापूरची जनता या विचाराला साथ देणार नाही, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत अतिआत्मविश्वासात राहू नका. मतदारांचा मान-सन्मान राखा. खोट्या प्रचाराला बळी पडू नका. राज्यात सत्ता असणार्‍या पक्षाचा आमदार निवडून दिल्यास त्याला जादा निधी देता येतो. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी व सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना साथ द्या, असे आवाहनही पवार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -