‘इंडियन प्रीमियर लिग’.. अर्थात ‘आयपीएल’च्या 15 व्या पर्वाला आता खऱ्या अर्थाने रंग चढला आहे.. ही स्पर्धा संपताच चाहत्यांसाठी क्रिकेटची दुसरी मेजवानी तयार असणार आहे.. ‘आयपीएल’नंतर लगेच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
‘आयपीएल’ सुरु असतानाच, क्रिकेट चाहत्यांना या मालिकेचे वेध लागले आहेत. मात्र, चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. ती म्हणजे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतल्याचे समजते..
‘आयपीएल’नंतर (IPL-2022) भारतीय संघ 9 ते 19 जून दरम्यान 5 शहरांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर लगेच टीम इंडिया आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.. त्यात एक कसोटी, 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे..
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियातील दिग्गज खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे कामाचा ताण लक्षात घेऊन प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे.
कोणा-कोणाला विश्रांती..?
कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के.एल. राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा या प्रमुख 7 खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. हे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या टी-20 मालिकेत एकाही मॅचमध्ये खेळणार नाहीत. शिवाय, या मालिकेत बायो-बबलपासून खेळाडूंची सुटका केली जाणार आहे..
काही प्रमुख खेळाडूंचा फाॅर्मही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.. टी-20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म नसलेल्या खेळाडूंसोबत मैदानावर उतरणं, टीम इंडियाला महागात पडू शकते. त्यामुळे ‘बीसीसीआय’ एक प्रभावी ‘वर्कलोड मॅनेजमेंट प्रोग्राम’ तयार करत आहे. त्यामुळे बायाेबबलमधून बाहेर आल्यावर खेळाडू ताजेतवाने होऊन परत टीम इंडियाचा भाग बनतील.
भारतीय संघाने आतापासूनच टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे खेळाडू मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं महत्वाचं आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. अर्थात, त्यांना किती दिवस विश्रांती द्यायची, याबाबत मुख्य कोच राहुल द्रविड याच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे..
हार्दिकचं काय होणार..?
दरम्यान, खराब कामगिरी व फिटनेसच्या कारणामुळे संघाबाहेर गेलेला हार्दिक पांड्याने ‘आयपीएल’मधून जोरदार कमबॅक केलंय. ‘आयपीएल’मध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय.. शिवाय 145 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करीत आहे. त्यामुळे त्याचा भारतीय संघातही समावेश होतो का, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे..