या उन्हाळ्याच्या हंगामात तळीराम लोकांना आता थंडगार बिअरसाठी (Beer) जास्त पैसे मोजावे लागू शकतात. पेट्रोल-डीझेल, किराणा, तेल यासह आता बिअरही महाग होण्याची शक्यता आहे. आता बिअरच्या किमतीही महागण्याचे कारण म्हणजे महागडी बार्ली आणि इतर कच्च्या मालाच्या किमती आहेत. यावेळी बिअरच्या किमती 10-15 टक्क्यांनी वाढवण्याचा विचार बिअर उत्पादन करणाऱ्या कंपन्या करत आहेत.
बिअर बनवण्यासाठी बार्ली(Barley) हा मुख्य घटक आहे. गेल्या वर्षी बार्लीच्या दरात 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय दिवसेंदिवस वाढलेले पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चही बिअरच्या किमती वाढण्याचे कारण ठरणार आहेत.
भारतातील दारूच्या किमती राज्यांच्या नियंत्रणाखाली असतात. तेलंगणा आणि हरियाणा सारख्या काही राज्यांनी दारूच्या किमती वाढवल्या आहेत, तर इतर राज्यांनी अद्याप तसे केलेले नाही. मार्च-जुलै या कालावधीतील बिअरच्या वार्षिक विक्रीचा वाटा 40-45 टक्के आहे.
2020 मध्ये देशातील बिअर मार्केट 371 अब्ज रुपये एवढं होतं. हेच 2026 पर्यंत 662 अब्ज रुपये होण्याचा अंदाज आहे. 2015-16 आणि 2018-19 दरम्यान देशातील अल्कोहोलिक ड्रिंक्सचे उत्पादन तब्बल 23.8 टक्क्यांनी वाढले आहे. हा उद्योग (India Beer Market) सुमारे 15 लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करतो. 2019 मध्ये बिअरच्या विक्रीतून 48.8 अब्ज डॉलर्सची कमाई झाली होती, अशी माहिती अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने दिली.