ताजी बातमी ऑनलाईन टीम
आर्थिक फसवणूकीच्या उद्देशाने नोटा आणल्याचा संशय, तिघांना अटक
शहरातील कृष्णाघाट येथे सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नंबर प्लेट नसलेल्या मोटारीतून रेक्झिन बॅगेतून या नोटांची वाहतूक केली जात होती. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी मंगळवारी रात्री बारा वाजता मिरज – कृष्णाघाट रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली. 3 लाख 56 हजार रुपये किमतीच्या बोगस नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये उमर खुदबुद्दीन एकसंबेकर (रा. सोमवार पेठ, कागल, जि. कोल्हापूर), नदीम सज्जन नालबंद (रा. नदिवस नाका, इचलकरंजी) आणि शब्बीर साहेब हुसेन पीरजादे (रा. गुरुवार पेठ, मिरज) या तिघांचा समावेश आहे. कोणाची तरी आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने या नोटा आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिरज कृष्णाघाट रस्त्यावरील एका विट भट्टीजवळ नंबर प्लेट नसलेल्या मोटारीतून सदर तिघे तरुण जात होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ एका रेकझिन बॅगेत भारतीय बच्चो का बँक असे छापलेल्या नोटांच्या 55 बंडले व त्यावर 500 रुपयांच्या खऱ्या चलनी नोटा लावून तसेच दोन हजार रुपयांच्या हुबेहुन खऱ्या दिसणाऱ्या नोटांचे 45 बंडल असे ३ लाख, ५६ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी सदर नोटा जप्त करून तिघांना अटक केली आहे.