पुण्यामध्ये मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. लग्नापूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाला आहे. लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेव आणि त्याच्या दोन मित्रांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे हे तिघे मित्र राहत असलेल्या हिंजवडी परिसरात शोककळा परसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीमध्ये राहणाऱ्या दीपक बुचडे या तरुणाचे 18 जून रोजी लग्न होणार होते. दीपकच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. लग्नाची पत्रिका नातेवाईकांना देण्यापूर्वी ती देवाला ठेवली जाते. दीपक त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या दोन मित्रांना घेऊन देवासमोर पत्रिका ठेवण्यासाठी गेला होता. तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोटला (Akkalkot) लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी ते गेले होते. तुळजापुरला पत्रिका ठेवून झाल्यानंतर ते गाणगापूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर रात्री उशिरा त्यांच्या गाडीला अपघात झाला. कार आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, नवरदेवासह त्याच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. दिपक सुभाष बुचडे (वय 29), आकाश ज्ञानेश्वर साखरे (वय 28), आशुतोष संतोष माने (वय 23) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. याप्रकरणी दीपकचे चुलत भाऊ चंद्रकांत राघुजी बुचडे याने अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. लग्नाला काही दिवस राहिलेले असताना दिपकचा मृत्यू झाल्यामुळे लग्नघरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.