मागील काही महिन्यांपासून महागाई लोकांचे कंबरडे मोडत आहे. व्यापार-उद्योग, रशिया-युक्रेन युद्ध, क्रूड ऑईलचे भाव व इतर काही जागतिक घडामोडींवर देशात होणारी महागाई कमी जास्त होते. यामुळे भारतात महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. आता भारतात अनेक वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे भाव मागील काही महिन्यांत वाढत आहे.
रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट काही दिवसांपूर्वी वाढल्याने लोकांच्या कर्जाचा ईएमआय वाढला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. आता नुकताच एका अहवालात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये पुढील येणाऱ्या काळात बँकांचे व्याजदर कसे असतील आणि महागाई दर कुठपर्यंत उडी मारेल, असा अंदाज सांगितला गेला आहे.
बँक आणि कर्जाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील Reserve Bank of India चा सध्या रेपो दर 4.9 टक्के असून, डिसेंबर 2022 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर वाढून 5.9 टक्के होतील, तर 2023 च्या अखेरपर्यंत व्याजदर 6.15 होऊ शकतो, असा अंदाज मानक संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने व्यक्त केला आहे. या काही गोष्टींमुळे कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या बँकांच्या संबंधित ग्राहकांना हप्त्याच्या रकमेत वाढ झाल्याने चांगली झळ सोसावी लागणार आहे.
खाद्यपदार्थ, कच्चे तेल महागल्यामुळे घाऊक महागाई मे महिन्यात 15.88 टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. त्यामुळे आरबीआयकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकाधिक वस्तू महाग होत असल्यामुळे ग्राहकांसमोर गंभीर आव्हान निर्माण होताना दिसत आहे. मागील तीन महिन्यांत खाद्य वस्तूंची महागाई सरासरी 7.3 टक्क्यांनी वाढल्याचं समजतंय. आरोग्य क्षेत्रातील महागाई देखील सध्या वाढली आहे.
‘फिच’ने जारी केलेल्या अहवालात काय?
‘ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूक’ या नुकत्याच सादर केलेल्या अहवालात सांगितलंय की, भारतीय अर्थव्यवस्था सध्या बिघडते बाह्य पर्यावरण, वाढत्या किंमती आणि कडक जागतिक पतधोरण यांना सामोरं जात आहे. सध्याच्या महागाई दरानुसार पुढे पाहता, रिझर्व्ह बँक डिसेंबर 2022 पर्यंत धोरणात्मक व्याजदर वाढवून तो 2023 च्या अखेरपर्यंत व्याजदर 6.15 टक्के होईल. याशिवाय 2024 मध्ये हा व्याजदर अपरिवर्तनीय असू शकतो, असं अहवालात म्हटलं आहे.