महाराष्ट्र पोलिस दलांसह रेल्वेमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक तसेच टी. सी. क्लार्क म्हणून नोकरीला लावण्याच्या आमिषाने सोमवार पेठ येथील तरुणासह त्याच्या साथीदाराकडून 7 लाख 75 हजार रुपये उकळल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात विजय लक्ष्मण व्हरांबळे (रा. व्हरांबळे अॅकॅडमी, गोळीबार मैदान) याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
जानेवारी 2019 ते डिसेंबर 2021 या काळात कसबा बावडा येथील गोळीबार मैदानाजवळील व्हरांबळे अॅकॅडमीमध्ये हा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत संशयित पोलिसांच्या हाताला लागला नव्हता. व्हरांबळे याने अनेक सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना गंडा घातला असावा, असा संशय शाहूपुरीचे प्रभारी पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी व्यक्त केला. संबंधिताकडून फसगत झालेल्या व्यक्तींनी शाहूपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.