ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापुरातील सात राखीव संवर्धन क्षेत्रे
ठाणे/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड, चंदगड, गगनबावडा, आजरा, भुदरगड, मसाई पठार या क्षेत्रांचा राखीव संवर्धन क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांत 1 हजार 750 चौरस कि.मी.वर राज्यात नवीन राखीव संवर्धन क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरमधील या सात क्षेत्रांचा समावेश आहे.
मोठे राखीव वनक्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्याऐवजी छोट्या आकाराचे संवर्धन क्षेत्र राखीव म्हणून घोषित करणे ही संकल्पना अलीकडच्या काळात रुजली आहे. त्यानुसार ही 23 क्षेत्रे राज्यात राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामुळे गावांचे व लोकांचे पुनर्वसन करावे लागत नाही. त्यामुळे स्थानिकांचा विरोधही होत नाही. संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आरक्षित केलेल्या जागांना राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळते. कारण, या जागा जरी वन्यजीव संरक्षण कायद्याने जाहीर झाल्या असल्या, तरी स्थानिकांचे हक्क अबाधित राहतात. त्यामुळे राखीव संवर्धन क्षेत्र हा पर्याय अलीकडच्या काळात वाढला आहे.






