कोडोली गावात तलावामध्ये पाण्यात बांधलेला पूल व घाट
मद्यपींचा अड्डा बनला आहे. मद्यपींच्या धिंगाण्यामुळे सामान्य नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी कोडोली गावातील नागरिकांतून होत आहे. कोडोली- पोखले रस्त्यावरील वैभवनगर वसाहतीजवळ गावतलाव आहे. या तलावाच्या बांधावरती घाट बांधण्यात आला आहे.
त्याचबरोबर तलावाच्या मध्यभागी पर्यटकांना जाण्याकरिता पाण्यात पूल बांधला आहे. या पुलावर रात्रीच्या वेळी कोणीही फिरकत नाही. याचा नेमका फायदा मद्यपींनी घेतला आहे. दारुच्या बाटल्या घेऊन मद्यपी येथे येतात. तलावातील पूल व घाटावर बसून दारू पिण्यास सुरुवात करतात. जसजशी वेळ वाढत जाईल तसतसा मद्यपींना चेव चढतो. येथून वैभवनगर, हौसिंग कॉलनी, वाडीहुडूंब, गंगा तारा कॉलनीतील मुली, महिला या तलावशेजारील रस्त्यावरून ये-जा करतात. यावेळी मद्यपी शिव्या देणे, अश्लील वर्तन करीत असल्याने या ठिकाणी मुली व महिलांना येणे-जाणे करण्यास लाजिरवाणे वाटते.
तसेच मारामारी, वादातून भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तलावाच्या घाटावर विरंगुळ्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही या मद्यपींचा त्रास होत असल्याने या ठिकाणी त्यांनी येणे बंद केले आहे. दारु पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या तलावाशेजारीच पटांगणावर फोडून टाकल्या आहेत. सरावासाठी येणाऱ्या काही खेळाडूंच्या पायांना मोठी दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा अशा मद्यपींचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.