शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे वर्ष असणाऱ्या व कोरोनानंतर झालेल्या दहावीच्या ऑफलाईन परीक्षेत कोल्हापूरने चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलीच हुश्शार ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 0.89 ने जास्त आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात 84.54 टक्के गुणांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष महेश चोथे, प्रभारी सचिव डी. एस. पोवार, सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षीचा निकाल हा बेस्ट ऑफ फाईव्हनुसार आहे.
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत 2 हजार 310 माध्यमिक शाळांमधील 2 हजार 108 परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. कोल्हापूर विभागातून 1 लाख 30 हजार 835 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 28 हजार 884 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 98.50 टक्के आहे. विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 98.99 टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल 98.10 टक्के आहे. यामध्ये मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त आहे.