जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेबाबत दाखल झालेल्या 34 हरकतींवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी निर्णय दिला आहे. त्यांचा निर्णय बंद पाकिटातून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र किती हरकती फेटाळल्या, किती मान्य केल्या याची माहिती सोमवार, दि. 27 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप रचना दि. 2 जूनरोजी प्रसिध्द करण्यात आली. दि. 8 जूनपर्यंत या प्रारुपबाबत हरकती घेण्याची मुदत होती. या कालावधीत 34 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये आटपाडी तालुक्यातील सर्वाधिक 11 हरकती दाखल झाल्या होत्या. तसेच मिरज 5, तासगाव 5, जत 3, पलूस 5, वाळवा 4 व शिराळा तालुक्यातील एक हरकतीचा समावेश होता.
मतदारसंघाची भौगोलिक संलग्नता नाही, गाव जुन्याच मतदारसंघात असावे, या प्रकारच्या हरकती अधिक आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मूळ मतदारसंघातून काही गावे वगळून नव्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हे करताना काहींच्या सोईची गावे मतदारसंघात राहिलेली नसल्याबाबत आक्षेप होते. प्रभाग रचना कशी चुकीची आहे, असा दावा तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांपुढे सुनावणीवेळी केला होता. विभागीय आयुक्त राव यांनी सुनावणीसाठी आलेल्या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. या हकरतींवर 22 जूनला अंतिम निर्णय देण्याची मुदत होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील 34 हरकतींवरील निर्णय बंद लिफाफ्यातून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र किती हरकती फेटाळण्यात आल्या, हे सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी मतदारसंघ जैसे थे राहिले की आक्षेप असलेले बदलले हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या हरकती दाखल झालेल्या भागात उत्सुकता वाढली आहे. तसेच येत्या काही दिवसांत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लागणार आहे.