Sunday, July 6, 2025
Homeसांगलीम्हैसाळ आत्महत्या प्रकरण : दोन मांत्रिक 'रडार'वर! गुप्तधनाचे कारण चौकशीतून पुढे

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : दोन मांत्रिक ‘रडार’वर! गुप्तधनाचे कारण चौकशीतून पुढे

म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येमागे सावकारीसह गुप्तधनाचे कारणही चौकशीतून पुढे येत आहे. दोन मांत्रिकही ‘रडार’वर आले आहेत. या मांत्रिकांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी सोलापूर व कर्नाटकात छापे टाकले, पण रात्री उशिरापर्यंत त्यांचा सुगावा लागला नाही.

चार दिवसांपूर्वी डॉ. माणिक वनमोरे यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी वनमोरे यांनी लिहिलेल्या दोन चिठ्या सापडल्या होत्या. यामध्ये काही सावकारांसह गावातील 25 लोकांच्या नावांचा उल्लेख होता.
आर्थिक कारणातून कुटुंबाने जीवन संपविल्याचे चिठ्ठीतील मजकुरावरुन स्पष्ट झाले होते. सावकारी, आत्महत्येस प्रवृत्त व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पंधराहून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वनमोरे कुटुंबाच्या संपर्कात दोन मांत्रिक आले होते. या मांत्रिकांनी वनमोरे यांना घरातील गुप्तधन शोधून देण्याचे अमिष दाखविले होते. या बदल्यात मांत्रिकांनी त्यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम मागितली. ही रक्कम वनमोरे यांनी दिली होती. त्यानंतर हे मांत्रिक रक्कम घेऊन गायब झाल्याचे समजते.

वनमोरे यांनी रक्कम काही सावकार व परिचयाच्या लोकांकडून घेतली होती. ते लोक त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत होते, पण त्यांना ही रक्कम देता आली नाही.

पैसे द्यायचे कोठून? या विचाराने वनमोरे कुटुंब चिंताग्रस्त होते. यातून त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. गेल्या चार दिवसांच्या तपासातून या कुटुंबाच्या आत्महत्येमागे गुप्तधनाचे कारण पुढे आले आहे. तसेच दोन मांत्रिकांची नावेही निष्पन्न झाली आहेत. हे दोन्ही मांत्रिक सांगोला व कर्नाटकातील असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची सात पथके सोलापूर व कर्नाटकात रवाना झाली आहेत. पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र अजून कोणाचा सुगावा लागलेला नाही. पथक या भागात तळ ठोकून आहे. त्यांनी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली आहे.

दरम्यान, लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात यश येईल, असे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले. संशयित आरोपींची संख्या वाढणार आहे. तसेच मूळ कारणापर्यंत जाण्यात आम्हाला यश येईल, असेही सिंदकर यांनी सांगितले.
सावकार अन् उसनवारीतून तीन कोटीचे देणे झाले अंगावर
अटकेतील सावकार आणि गावातील अन्य संशयित यांच्याकडून वनमोरे कुटुंबाने तब्बल तीन कोटी रुपये घेतले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे येत आहे. काही संशयित तर आमच्याकडून वनमोरे यांनी रक्कम घेतलीच नाही, असा सांगत आहेत. कुटुंबातील कोणीच व्यक्ती हयात नसल्याने रकमेबाबत अजूनही गूढ निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -