चांगलं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं कित्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून विद्यार्थी स्वतःला तयार करतात. परदेशातील शिक्षण म्हटलं की वारेमाप पैसा खर्च करावा लागतॊ. परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या देशाशी आणि विद्यापीठाशी संबंधित आवश्यक माहिती गोळा करावी लागते. असं असताना सध्या परदेशात शिक्षणाच्या नावाखाली अनेक घोटाळे चव्हाट्यावर आले आहेत.
या घोटाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहोत त्याची संपूर्ण माहिती हवी. ते महाविद्यालय खरोखर त्या देशात आहे की नाही हे देखील शोधायला हवं.
एंजटगिरीपासून सावध राहून कॉलेजच्या अधिकृत वेबसाइटला पूर्णपणे भेट दिल्यास संपूर्ण माहिती आणि इतर आवश्यक तपशील मिळू शकतो. परदेशी विद्यालयांमध्ये प्रवेश घेत असताना कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेतल्यास अडचणींबद्दल माहिती मिळू शकते आणि प्रक्रिया समजण्यास मदत होईल.
व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखालीही अनेक एजंट विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे एंजट या गोष्टीपासून लांबच राहावं. यासोबतच कोणताही अनैसर्गिक पर्याय किंवा बेकायदेशीर पर्याय बाहेर देशातील शिक्षण घेण्यासाठी निवडू नका. जे काही असेल ते कायदेशीर मार्गाने करा.
तुम्ही एज्युकेशन लोन घेत असाल तर स्वतः बँक अधिकाऱ्यांना भेटा आणि लोन घेण्याबाबत जी काही प्रक्रिया आहे ती नीट समजून घ्या. लोन घेताना देखील अनेक एजंट भेटत असतात आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून विद्यार्थ्यांनी सावध राहायला हवं.