तब्बल १४० कोटी रुपयांच्या बनावट बिलासंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) येथील कार्यालयाकडून व्यापारी असलेल्या दोघा सख्ख्या भावांना त्यांच्या कार्यालयातून आज अटक केली आहे. तिरुपती मेटल्सचे मालक राम दिलीप बैराणी (वय ३५, रा. उजळाईवाडी) आणि बालाजी एन्टरप्रायजेसचे (balaji enterprises) मालक सुरेश दिलीप बैराणी (३८, मटण मार्केट परिसर, लक्ष्मीपुरी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. खोट्या बिलांपोटी या दोघांनी २५.३५ कोटींची वजावट मिळविली आणि त्याद्वारे शासनाचे महसुली नुकसान केले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जीएसटी अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत दिलेली माहिती अशी दोघा भावांनी आपल्या नातेवाईक व कामगार यांच्या नावावर तिरुपती ट्रेडर्स, दुर्गा ट्रेडिंग आणि कृष्णा एन्टरप्रायजेस या बनावट कंपन्या सुरू केल्या आहेत. तिरुपती मेटल व बालाजी एन्टरप्रायजेस (balaji enterprises) या दोन्ही व्यापारात (प्रकरण) वस्तूंच्या प्रत्यक्षात खरेदीशिवाय गुजरातमधील भावनगर व अहमदाबाद येथील बनावट कंपन्यांकडून १४० कोटींची खोटी बिले घेऊन २५.३५ कोटींची वजावट मिळविली आहे. दोन्ही करदात्यांनी जीएसटी अधिनियम २०१७ च्या तरतुदीचे उल्लंघन करून वस्तूंची प्रत्यक्षात खरेदी न करता बीजके किंवा बिले स्वीकारून शासनाची मोठ्या प्रमाणात महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान सर्व व्यवसायामध्ये राम व सुरेश बैराणी कर्ताधर्ता असून, महसूल हानीमध्ये प्रत्यक्षात सहभागी असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे दोघांना जीएसटीच्या कोल्हापूर कार्यालयातील अन्वेषण शाखेकडून कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी आज अटक केली. कारवाईत विशेष बाब म्हणजे संबंधित मालाची खरी वाहतूक झाली आहे की नाही, याची ई-वे बिल प्रमाणे तपासणी करून संबंधित वाहन खरेच त्या मार्गावर वाहन मार्गक्रमण करीत होते की नाही हे शोधण्यात आले. त्या द्वारे संबंधित मालाचा प्रत्यक्ष पुरवठा झाला आहे की नाही हे शोधण्यात विभागाला यश मिळाले आहे. राज्य कर उपायुक्त सलीम बागवान व सहायक राज्य कर आयुक्त जयांकुर चौगले व ज्ञानोबा मुके आणि राज्यकर निरीक्षक यांच्यामार्फत कारवाई झाली आहे. कारवाईसाठी कोल्हापूर क्षेत्राचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे व कोल्हापूर विभागाच्या सहआयुक्त (प्रशासन) श्रीमती सुनीता थोरात यांचे मार्गदर्शन मिळाले.
पाचही जिल्ह्यात कारवाई करणार
बनावट व्यापार करून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे बाजारपेठेतील स्पर्धा नष्ट होते. त्यामुळे सुयोग्य व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते; मात्र या कारवाईतून जीएसटी विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. येत्या कालावधीत अशा प्रकारची कारवाई कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक तीव्र करण्याचा इशारा कोल्हापूर विभागाच्या सहआयुक्त सुनीता थोरात यांनी दिला आहे.