कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत क्रांतिकारी निर्णय घेऊन विधवा पुनर्विवाहास संमती देणारा कायदा केला होता. हा विचार पुढे नेण्यासाठी विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था व्हावी, यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी 10 लाखांचा निधी कानपूर विद्यापीठाकरिता जाहीर केला.
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे असलेल्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठामध्ये राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम माजी खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही ‘व्ही.सी.’च्या माध्यमातून कार्यक्रमास उपस्थिती लावली. वंचित व शोषित घटकांना न्याय देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची महती सांगणारे नाट्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.
यानंतर राजर्षीच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान झाले. संभाजीराजे म्हणाले, 1919 साली कानपूर येथील कुर्मी समाजाने छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी दिली होती. त्याच शहरातील महाराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठात त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. विद्यापीठाला निधी दिल्याबद्दल कुलगुरू विनय पाठक यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले.