पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या ट्रॅक्टरमधील डिझेल चोरताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. बायपास रस्त्यावर हा प्रकार घडला. चोरट्यांनी चोरलेले दहा लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.
जोतीराम जाधव व लालसिंग दुधे (दोघे रा. सांगली) अशी या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत अमर धनंजय जाधव (वय 39, रा. गजानन हौसिंग सोसायटी, गोवारे, ता. कराड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जाधव यांनी बायपास रस्त्यावर लक्ष्मी गॅरेज येथील पार्किंगमध्ये त्यांचा ट्रॅक्टर (क्र. एमएच 09 सीयू-5470) लावला होता. दि. 23 जूनरोजी सकाळी अकरा वाजता संशयित तिथे प्लॉस्टिकचा कॅन घेऊन गेले.
ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत पाईप टाकून कॅनमध्ये ते डिझेल काढत होते. गॅरेजमधील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर या दोघांना पकडण्यात आले. शहर पोलिसांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दहा लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 960 रुपये आहे. संशयितांनी आणखी कोठून वाहनामधील पेट्रोलडिझेलची चोरी केली आहे का, याबद्दल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.