ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी केली जाते. या अंतर्गत जिल्हा प्रशासानातर्फे ‘समता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. समतेची शिकवण देत सर्व जाती-धर्मीयांची एकजूट करणाऱ्या लोकराजाचा अखंड जयघोष करत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी भरपावसात राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा केला.
दसरा चौकातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आणि झेंडा दाखवून समता दिंडीचा प्रारंभ शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.