एसटी महामंडळास पुरविण्यात आलेल्या मशीन देखभाल दुरूस्तीचा करार देखील संपुष्टात आला आहे. त्यामुळे आधुनिकतेसोबत जाणारी एसटी (ST bus) गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा माघारली असून एसटी कंडक्टर पूर्वीप्रमाणेच तिकीट…तिकीट.. म्हणत हातात पुन्हा पंचिंगरूपी चिपळी (पंचिंग मशीन) वाचवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून एसटीच्या (ST bus) तिकीट यंत्रामध्ये बिघाड झाल्याने अनेक बसेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिराने सोडण्यात येत आहेत. यामुळे एसटीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे एसटी (st) वा रेल्वेद्वारे प्रवासांसाठी तिकीट खिडकीवर गेल्यानंतर कडक पुठ्ठ्याच्या तिकिटावर प्रवासाच्या तारखेचे पंचिंग करणार्या मशिन ऐवजी संगणकीय तिकीट उपलब्ध आहे.
तर गावातील एसटीने सुद्धा गेल्या १५-१६ वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे कंडक्टरच्या एका खांद्यावर तिकिटांचा ऍल्यूमिनीअमचा ट्रे, दुसर्या खांद्यावर पैशांची चामडी बॅग असे आणि एका हाताने प्रवासाची तिकिटे मोजून थांब्यांच्या क्रमानुसार पंचिंगच्या चिपळीने टकटक करणारा बस कंडक्टर गेल्या १५/२० वर्षांपासून दिसेनासे झाला होता. ते तिकीट मशिनींच्या बिघाडामुळे पुन्हा वापरात काढण्यात आले आहेत.
पाचोराला जाण्यासाठी जळगाव स्थानकावरून शेवटची बस ६.३० नंतर सोडण्यात येते. परंतु, तिकीट मशीन नादुरूस्त असल्याने अडगळीत पडलेल्या छापील तिकिटांचा ट्रे घेऊन पाचोरा बस स्थानकातून नियमित वेळेपेक्षा तब्बल दीड तास उशिराने साडेसहा वाजता जळगावसाठी पाच वाजण्याची बस सोडण्यात आली. ही बस जळगाव येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येवून शेवटच्या बससाठी ताटकळत असलेल्या प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली.
नवीन कंडक्टरच्या डोक्याचे खोबरे
नवीन भरती झालेल्या वाहकांना आगारातून घेतलेल्या तिकिटांचे सिरीजनुसार क्रमांक, बुकींग झाल्यांनतर सिरीजनुसार विक्री झालेली तिकीटे यांची नोंद कॅटलागमध्ये करणे अवघड आहे. त्यामुळे ऐनवेळी जुन्या वाहकांना या मार्गावर पाठवण्यासाठी आगारप्रमुख, वाहतूक नियंत्रकांना शोधाशोध करावी लागत असून अडगळीत पडलेले तिकिटांचे ट्रे काढून पुन्हा उपयोगात आणले जात आहेत.
यात १०, २०, ५, आणि अन्य छापील मूल्य रक्कमेचे एक-एक तिकीट जोडून देण्यात अडचणी येत आहेत. सुट्या पैशांची तिकीटे नसल्याने दिलेली तिकीटे व उर्वरित तिकिटांचा मेळ बसविताना कंडक्टरचे नाकेनऊ झाले आहे. तर नव्याने भरती झालेल्या बर्याच कंडक्टरांच्या डोक्याचे खोबरे होत आहे.
अनेक मार्गांवर बसेस उशिराने
पाचोरा बस स्थानकात सकाळी ९ वाजेपासून दोन ते तीन बसेस प्रवाशांना घेऊन उभ्या असल्या तरी मशीन बंद आणि वाहक उपलब्ध नसल्याने सुमारे अर्धा ते पाऊण तास पुन्हा खोळंबा झाल्याने अनेक शासकीय खासगी आस्थापंनामधील कर्मचार्यांना उशिराने जावे लागले.
दुरूस्ती देखभालीसाठी निधीची कमतरता?
जिल्हयात बर्याच बस आगारात तिकीट मशिनच्या बॅटरी बंद पडणे, मशीन बॉडी कव्हरचे लॉक तुटणे, बॅटरी वा मशीन स्टार्टअप बटन निखळणे अशा अनेक तांत्रिक अडचणी असून बर्याच मशीनचा करार संपुष्टात आलेला आहे. दुरूस्तीसाठी निधी नाही, आंतरराज्य वा पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत अशा लांब पल्ल्याच्या फेर्या केलेल्या बहुतांश बसेस ग्रामीण दुरूस्ती अभावीच धावत आहेत.
काही बसेसला रंगरंगोटी करून नवी केली असली तरी आतले मशीन वा प्रवाशांची बैठक व्यवस्था अत्यंत मोडकळीची, तोकडी आणि काम चलावू साहित्याचा वापरामुळे रस्त्यांवर वारंवार बंद पडणार्या बसेसमुळे प्रवाशांना वेळेसह पैशाचा अपव्यय सहन करावा लागत आहे.