ताजी बातमी ऑनलाईन टीम
करंजफेण ; कासारी खोऱ्यात सुरू असणाऱ्या जोरदार अतिवृष्टीने बर्की (ता. शाहूवाडी) येथील धबधबा प्रवाहित झाला आहे. बर्की मुख्य रस्त्यावरील बंधारा पाण्याखाली जात असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे.
हिरवेगार डोंगर, त्यात वाहणारे धबधबे, डोंगरांना कवेत घेणारे धुके अन् कोसळणारा पाऊस यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. बोटिंगचा आनंदही लुटतात. पर्यटकांच्या पसंतीला उतरलेले हे पावसाळी पर्यटनस्थळ अतिपावासामुळे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचे ग्राम मंडळाचे अध्यक्ष आनंद पाटील, उपाध्यक्ष गंगाराम बमू घुरके, सचिव विकास कांबळे यांनी संगितले.
बर्की बंधाऱ्यावर पाण्याच्या लाटा येत असल्याचे पाहूनही व ग्रामस्थांनी धोक्याची दिलेली कल्पना ऐकूनही काही अतिउत्साही पर्यटक धबधब्याकडे जात आहेत. परतताना बंधाऱ्यावरून पाणी वाहत असतानासुद्धा जीवाची पर्वा न करता त्यातून गाड्या घालत असल्याचे व चालत दंगामस्ती करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा पर्यटकांच्या वागण्यामुळे ग्रामस्थांची डोकेदुखी मात्र वाढत आहे.