मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. सर्व जिल्हाप्रमुखांसह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिंदे गटासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना वगळून शिवसेनेची नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याची त्यांनी सूचना दिली आहे. त्यानुसार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, शहरप्रमुख सुनील मोदी (उत्तर), रवि इंगवले (दक्षिण) आदी सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा, शहरात शिवसेनेची भक्कम संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संपर्क दौऱ्यात त्यांना शिवसैनिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून कोल्हापूरची सेना अभेद्य असल्याची ते ग्वाही देत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बाधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली. शिवसेना शाखांना भेटी दिल्या जात आहेत. तर राज्यात ज्या मतदारसंघातील आमदारांनी बंडखोरी केली आहे अशा मतदारसंघात शिवसेनेच्या मेळाव्यांना भर पावसात हजारोंची गर्दी जमत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आचार, विचार प्रमाण मानून जगणाऱ्या शिवसैनिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच सेनेसाठी झोकून देऊन काम करणारे नव्या दमाचे सैनिक संघटनेत सहभागी होत आहेत.
सेनेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख अशी रचना आहे. युवा सेना, महिला संघटनेसह अन्य अंगिकृत संघटनेमध्येही हीच रचना पहावयास मिळते. त्यामुळे ‘मातोश्री’वरून आलेला प्रत्येक आदेश आणि सूचना तळागाळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. जिह्यात ज्या नेत्याचा स्वतःचा गट आहे, अशा नेत्यांना शिवसेनेकडून विधानसभेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली. सेनेच्या चिन्हावर काहींनी मैदान देखील जिंकले. पण आज शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर काहींनी ‘नरोवा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली आहे. खासदार प्रा. मंडलिक यांच्यासह दोन जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह अन्य निष्ठावंत शिवसैनिकांकडून जिल्हा पिंजून काढला जात आहे.