ताजी बातमी ऑनलाईन टीम
पन्हाळगडावर एका झुणका भाकर केंद्रात ओली पार्टी रंगल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर कोल्हापूरसह राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, ज्या झुणका भाकर केंद्रावर हा प्रकार घडला, त्याच्या मालकाने असा काही प्रकार घडला नाही, असा निर्वाळा दिला. सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो जुना कधीचा तरी असावा, असे म्हटले आहे. मात्र, गुरुवारी जे पर्यटक झुणका भाकर खायला आले होते. ते सर्व कुटुंबातील सदस्य होते व परप्रांतीय होते, असेही केंद्र चालकाने सांगितले.
गडावर असे प्रकार होणे पूर्णतः चुकीचेच आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबविल्या पाहिजेत, अशी मागणी शिवप्रेमी जनतेतून होत आहे. पन्हाळ्याच्या संवर्धनाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे, याच्या निषेधार्थ शिवप्रेमी जनतेने आज (दि.२४) पन्हाळ्यात पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच पन्हाळा नगरपालिकेलाही निवेदन दिले.
पन्हाळगडावर एका झुणका भाकर केंद्रात दारू पीत बसलेल्या एका कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, आज पन्हाळा संवर्धनसाठी व गडावर दारूबंदीबाबत महाराष्ट्रातील विविध शिवप्रेमी संघटना गडावर एकत्र आल्या. यावेळी शिवप्रेमींनी अंबरखाना येथे जमून नंतर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मोर्चाने जाऊन पन्हाळा नगरपालिका व पुरातत्व विभागाला निवेदन दिले.