राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या वृत्तामुळे कोल्हापुरातून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या कोट्यातून विनय कोरे व प्रकाश आवाडे यांनी तर शिंदे गटातून राजेंद्र पाटील-यड्रावकर व प्रकाश आबिटकर यांच्या नावांची चर्चा आहे. विसर्जित मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.
यामुळे शिंदे गटातून कोणाला मंत्रिपद मिळणार याची त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. तसेच प्रकाश आवाडे यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून कोरे व आवाडे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.