ताजी बातमी ऑनलाईन टीम
सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल होणार आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकिंग नियम, एलपीजीच्या दर यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल कोण- कोणते असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत….
म्युच्युअल फंडाच्या नियमांमध्ये बदल –
1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी नामांकन तपशील देणे आवश्यक असेल. त्याचबरोबर असे न करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक डिक्लेरेशन भरावे लागेल. डिक्लेरेशनमध्ये नामांकनाची सुविधा द्यावी लागेल. यापूर्वी हा नियम 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार होता मात्र तसे होऊ शकले नाही आणि ही मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर हे लक्षात ठेवा.
Card Tokenisation नियम लागू –
देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. 1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता. पण आरबीआयने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. त्यानंतर आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करणार असल्याचे जाहीर केले होते. आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.
अटल पेन्शेन योजनेचा फायदा मिळणार नाही –
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5,000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते. पण आता 1 ऑक्टोबरपासून या योजनेत बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही करदाते असाल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचीच संधी आहे.