कोल्हापुरातून (Kolhapur) हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील कागल (Kagal) शहरात तिहेरी हत्याकांड (Murder case) समोर आले. पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली आहे. प्रकाश बाळासाहेब माळी (वय 42) असे या आरोपीचे नाव आहे. या हत्या केल्यानंतर तो स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला आहे. कौटुंबिक कलहातून त्याने कुटुंबातील तिघांचाही गळा आवळून त्यांना संपवले असल्याचे त्याने स्वतःच पोलिसांना सांगितले आहे.
असा घडला प्रकार
प्रकाश माळी हा कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये राहायचा. त्याच्यासोबत पत्नी, मुलगा व मुलगी असा सुखी संसार होता. मात्र कौटुंबिक कलहातून त्याने संपूर्ण कुटुंब संपवण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोन वाजेपासून संध्याकाळी आठपर्यंत त्याने घरातील तिघांनाही संपवले. दुपारच्या सुमारास मुलं हे शाळेत गेलेले होते. यावेळी त्याने पत्नी गायत्री (वय 37) यांचा गळा आवळून खून केला. यानंतर सायंकाळी मुलगा कृष्णात शाळेतून घरी आला. तेव्हा त्याचा देखील वडिलांनी खून केला. कृष्णात हा दिव्यांग होता. यानंतर रात्री आठच्या सुमारास मुलगी अदिती (वय 17) घरी परतील. तेव्हा तिलाही वडिलांनी संपवले.
स्वतःच पोलिसात हजर झाला आरोपी
कागल शहरात घडलेल्या या हत्याकांडाने शहरात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कारणातून या व्यक्तीने स्वतःचेच कुटुंब संपवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपी हत्या केल्यानंतर स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्याने स्वतःनेच पोलिसांना या संपूर्ण घटनेविषयी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कागल पोलिसांकडून केला जात आहे.
चारित्र्यावर होता संशय
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. या कारणामुळे या दोघांचे सतत भांडण होत असतं. दुपारी दोन वाजता पत्नी फोनवर बोलत असताना पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला. या वादानंतर या प्रकाश माळी यांनी टोकाचे पाऊल उचलत अख्ख कुटुंब संपवलं आहे.
आरोपीला पश्चताप नाही
आरोपीने कुटुंबियांची हत्या केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश नव्हता. हत्या करुन तो भावाच्या घरी गेला, त्याला सांगितले की, मी कुटुंबाला संपवून आलोय. मात्र त्याला मस्करी वाटली. नंतर त्याने पोलिसांना स्वतः सर्व सांगितले. ‘दुपारी दोन वाजता बायकोचा गळा आवळून खून केला. मग पाच वाजता मुलगा घरी आला त्यालाही संपवले. मुलगी घरी आली तेव्हा तिच्याही डोक्यात वरवंटा घातला’ असं तो सहजरित्या सांगत होता.