ताजी बातमी ऑनलाईन टीम
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL) विरोधात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दिल्लीतील एका व्यक्तीने आयपीएल सामन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या वर्षी IPL 2021 कोरोना महामारीच्या दरम्यान खेळली गेली. आयपीएलची ही स्पर्धा 2 भागात झाली. IPL 2021 चा पहिला भाग भारतातच झाला होता, पण अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा UAE मध्ये खेळवली गेली. भारतात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांदरम्यान सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सामन्यांवर बंदी घालण्याची आणि खेळाडूंचा जीव धोक्यात घालणाऱ्या आयपीएलवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या काळात इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने आयोजित करण्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. न्यायालय म्हणाले की, कालांतराने काही याचिका अप्रासंगिक बनल्या आहेत. सरन्यायाधीश ललित आणि न्यायमूर्ती एस.आर. भट यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली आहे.
दरम्यान, आयपीएलची (IPL) सुरुवात 2008 साली झाली. या लीगचे आतापर्यंत 15 हंगाम खेळले गेले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन याच वर्षी भारतात खेळला गेला. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. बीसीसीआय या लीगच्या माध्यमातून बक्कळ पैसा देखील कमवते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.




