प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्विकारून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सामना रंगणार आहे. देशभरातील 65 हून अधिक केंद्रांवर यासाठी मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेसचे 9 हजारांहून अधिक प्रतिनिधी मतदान करणार आहेत. काँग्रेसमध्ये 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेर व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस समित्यांचे (पीसीसी) 9 हजारांहून अधिक प्रतिनिधी गुप्तपणे मतदान करतील. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि देशभरातील 65 हून अधिक केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा हे एआयसीसी मुख्यालयात मतदान करण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’चे नेतृत्व करत आहेत. ते कर्नाटकातील बेल्लारी येथील संगनकल्लू येथील भारत जोडो यात्रेच्या ठिकाणी मतदानात सहभागी होतील. यात्रेत सहभागी असलेले सुमारे 40 पीसीसी प्रतिनिधीही त्यांच्यासोबत मतदान करतील.