मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj ) दोन ते तीन भागांत भव्य दिव्य चित्रपट घेऊन येणार असून त्याच्यावर काम सुरु असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) निमित्ताने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेमुळे महराष्ट्रातील जनता आणि शिवप्रेमींना प्रचंड आनंद झाला आहे.
राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला आपला आवाज दिला आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावेने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तीन भागाच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही जाहीर केले. या चित्रपटाच्या निर्मितीचे काम कोणाकडे आहे? हे काम कुठपर्यंत आले आहे, हे सांगण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला. हा प्रकल्प पूर्ण झाला की यावर सविस्तर बोलुयात असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपटच होऊ शकत नाही. अफजल खान, पन्हाळा गडावरून महाराज निघणं आणि विशाल गडावर जाणं, आग्रावरून सुटका. या चार-पाच विषयांच्या पलीकडे प्रचंड मोठे शिवाजी महाराज आहे. आपण फक्त या चार पाच प्रसंगांना घेऊन अडकलो, तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण अन्याय करतोय असे मला वाटते. याच कारणामुळे आपण टीव्ही सिरियल करायला हवी, असे मला वाटले होते.’
यावरून माझ्या मनात आलं की, आपण टीव्ही सीरिअल करू. यासाठी मी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोललो. त्यांच्याशी या संबंधित माझी दोन ते तीन वेळा चर्चाही झाली. तेव्हा एकदा हीच चर्चा सुरू असताना एके दिवशी नितीन चंद्रकांत देसाई आमच्यासोबत होते. त्यांनी ही टीव्ही सिरीयल करण्याची तयारी दाखवली. मी त्यांना होकार दिला. पुढे नितीन देसाई यांनी सिरीजची निर्मिती केली. ही सिरीज खूप वर्षांपूर्वी येऊनही गेली,” अशी माहितीही राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरेंनी पुढे सांगितले की, ‘पण आता सर्व प्लॅटफॉर्म बदलेले आहेत. फिल्ममेकिंगही बदलले आहे. सर्व गोष्टी बदलेल्या आहेत. आता माझं यावर काम सुरू आहे. याबाबत मी जास्त आता सांगत नाही. मात्र मी याचं काम दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर दोन ते तीन भागात चित्रपट निर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. मी हे काम कोणाकडे दिले आहे, याबाबतची अधिक माहिती आताच देणार नाही. हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा या विषयावर आपण सविस्तर बोलू,’ असे त्यांनी सांगितले.