ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये येत्या 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना रंगणार आहे. भारतीय संघ दुखापतींनी बेजार झालेला असतानाच, आता पाकिस्तान संघालाही मोठा झटका बसला आहे.
भारताविरुद्धच्या लढतीसाठी पाकिस्तान संघाने जोरदार सराव सुरु केला आहे. मात्र, एका सराव सत्रादरम्यान पाकिस्तान संघाचा स्टार बॅट्समन दुखापतग्रस्त झाला. शान मसूद असं या खेळाडूचे नाव आहे.
मसूद मैदानावर कोसळला..
मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा संघ सराव करीत होता. त्यावेळी मोहम्मद नवाज याचा गोलंदाजीवर शान मसूद हा बॅटिंगचा सराव करीत होता. त्यावेळी एक चेंडू थेट शानच्या डोक्यावर जोरात आदळला. त्यानंतर मसूद मैदानावर कोसळला.
शान मसूदला जोरात चेंडू लागल्याचे पाहून अन्य खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला. खेळाडूंनी तातडीनं आपल्या साथीदाराला सांभाळून घेत तातडीनं त्याला रुग्णालयात हलवलं.
मसूदच्या प्रकृतीबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र, बाॅल लागल्यावर ज्या प्रकारे तो मैदानात कोसळला ते पाहता, त्याची दुखापत गंभीर असू शकते. भारताविरुद्धचा सामन्यापूर्वी मसूद जखमी झाल्याने पाक संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.