पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Election 2022 ) होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज, 3 नोव्हेंबरला घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) आज गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होऊ शकते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करणार आहे याकडे राजकीय वर्तुळासोबतच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील मतदान 1 ते 2 डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात 4 ते 5 डिसेंबरला मतदान होऊ शकते. त्याचवेळी हिमाचल प्रदेशसोबतच गुजरात निवडणुकीचे निकालही 8 डिसेंबरला जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखांसह गुजरात निवडणुकीची घोषणा केली नव्हती.
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत एकत्र घोषणा होईल असे सर्वांना वाटत होते पण तसे झाले नाही. त्यावेळी निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. आतापर्यंत गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका या एकत्रच झाल्या होत्या. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आयोगाने एकत्र घोषणा न केल्यामुळे निवडणूक आयोगावर विरोधक टीका करत होते. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये गेल्या 24 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र यावेळीच्या निडणुकीत जरा समीरणे बदलण्याची शक्यत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये विजयी झाल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने चांगलीच ताकद लावली आहे. गुजरातमध्ये मागच्या वेळी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. 25 ऑक्टोबर 2017 रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. पहिल्या टप्प्यासाठी 14 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे निकाल 9 डिसेंबर 2017 आणि दुसऱ्या टप्प्याचे 14 डिसेंबर रोजी जाहीर झाले होते.