परतीच्या पावसाने ऑक्टोबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सुमारे 25 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनाही भरीव मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार, जून-जुलैपासून झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटीही मदत केली जाणार आहे.
ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून, यासंदर्भात कृषी व महसूल प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मंत्रीमंडळाचे अन्य निर्णय
कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, महिला सक्षमीकरणासह विविध उपक्रम राबविण्यासाठी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मान्यता देण्यात आली.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतील कामे, अंमलबजावणी व इतर निकषांत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.