कार्तिकी एकादशीनिमित्त आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी याआधी 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून आषाढीची शासकीय महापूजा केली आहे. यावेळी पहिल्यांदाच त्यांना कार्तिकीचा मान मिळाला आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळवणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले राजकारणी ठरले आहेत.
विठूरायाच्या मूर्तीला सर्वात आधी अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आली.यावेळी मानाचे वारकरी औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे हे ठरले. साळुंखे दाम्पत्यांना उपमुख्यमंत्र्याबरोबर महापूजा करण्याचा मान मिळाला.
50 वर्षांपासून वारी करणाऱ्या साळुंखे कुटुंबाला यावर्षी विठ्ठल पावला आहे. साळुंखे दाम्पत्य औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये राहतात. साळुंखे हे शेतकरी आहेत.विठूरायाची महापूजा पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा.’