काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेचा आज महाराष्ट्रात तिसरा दिवस आहे. नांदेडच्या (Nanded) शंकर नगरमधून राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरुवात झाली. असंख्य कार्यकर्ते या यात्रेत सामील झालेत. एकीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस जोडो यात्रा चर्चेत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातच एका काँग्रेस आमदाराच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. चक्क कोयत्याने केक कापून काँग्रेस आमदाराने कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ कार्यकर्त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलाय. त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय पातळीचा स्तर खालावत चाललाय की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीतील नेतेदेखील त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी होणार आहे. असं असताना काँग्रेसचे विद्यमान आमदारच धारदार कोयत्याने केक कापत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलीस याबाबत काही कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लगालंय. याआधी कोयत्याने, तलवारीने केक कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र आता देखील अशाप्रकारे कारवाई केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.