शिवप्रतापदिनी आज पहाटे प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण जिल्हा प्रशासन पाडलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाई परिसरात पुणे,कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून मोठा पोलीस बंदोबस्त पाचारण करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकारांमुळे शिवप्रेमींच्या लढ्याला यश मिळाले आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे. सुरूवातीला ही कबर काहीच फूट जागेत होती. मात्र, त्याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या एकरभर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं. त्यामुळे याठिकाणी अफजलखानाचं उदात्तीकरण केलं जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. हे अतिक्रमण काढावं यासाठी २००६ मध्ये स्थानिकांनी आंदोलनही केलं होतं.
शिवप्रताप दिनी खानाच्या कबरीवरील अतिक्रमण पाडलं, कमालीची गुप्तता
तेव्हापासून वाद सुरू होता. पुढे हा वाद कोर्टातही गेला. याप्रकरणी सुनावणीस आलेल्या याचिकांवर निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने १५ ऑक्टोबर २००८ व ११ नोव्हेंबर २००९ रोजी बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला पुढे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. मात्र, सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचेच आदेश योग्य ठरवत अनधिकृत बांधकाम तोडण्याची सूचना केली.
कबरीजवळील अवैध बांधकाम पाडा असे, आदेश असताना देखील आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने याबाबत कुठलीही कारवाई केली नव्हती. अखेर आज जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मिळून संयुक्तपणे कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. गुरूवारी शिवप्रताप दिनाची पहाट उजडताच कबरीजवळील अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाली आहे.
प्रतापगड पासून चार किलोमीटरच्या परिसरात संचारबंदीजन्य परिस्थिती?
या कारवाई बाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. शिवाय या परिसरात कायदा आणि स्यव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय शिवाय. शिवाय येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व वाहनांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे प्रतापगडपासून चार किलोमीटरच्या परिसरात संचारबंदीजन्य परिस्थिती आहे