माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी आज सकाळी ट्वीट (Jitendra Awhad Tweet) करत राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी 72 तासांमध्ये दोन खोटो गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड दुखावले गेले असून त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा देत पोलिस अत्याचाराविरोधात लढणार असल्याचे सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी राडा केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरा गुन्हा महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावर दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.’ जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याच्या ट्वीटनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचसोबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरुन आता सरकारवर टीका केली जात आहे.
दरम्यान, ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात हर हर महादेव हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर शनिवारी जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या 72 तासांत त्यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. कळव्यातील पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंग केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. मुंब्रा पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात खोटो गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.