गेल्या काही दिवसांपासून सत्तेतील राजकीय नेत्यांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यामुळे महिलांचा अवमान होत आहे. तसेच गृहखात्याकडून अशा नेत्यांना समज देण्याऐवजी एकप्रकारे बळच दिलं जात असल्याने महिला नेत्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. आज विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही भावना बोलून दाखवतानाच गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तसातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले. फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील नेत्यांच्या बेताल विधाना संदर्भात यावेळी चर्चा करण्यात झाल्याचं सांगितलं जातं. राज्यपालांकडून यावेळी फडणवीस यांना काही सूचना करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनिषा कायंदे, आमदार अदिती तटकरे, विद्या चव्हाण, आमदार ऋतुजा लटके आदी उपस्थित होते.
यावेळी या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे गृहखात्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. राज्यातील सत्तेतीलच नेते महिलांविरोधात विधाने करत आहेत. अश्लील टिप्पणी केली जात आहे. त्यांना सरकारकडून साधी समज दिली जात नाही. गृहखात्याकडूनही या नेत्यांना समज दिली जात नसल्याचं या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितल्याचं समजतं.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरही या महिला नेत्यांनी राज्यपालांकडे नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून विरोधकांना टार्गेट केलं जात असल्याचंही या महिला नेत्यांनी राज्यपालांना सांगितलं.
त्यानंतर या महिला नेत्यांनी मीडियाशी संवाद साधतानाही हाच आरोप केला. गृहखात्याकडून महिलांविरोधात बोलणाऱ्यांना बळ दिलं जात आहे. विरोधकांना टार्गेट करण्याचं काम गृहखातं करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्याकडून गृहखाते काढून स्वत:कडे घ्यावं, अशी मागणी या महिला नेत्यांनी केली आहे.