कुपवाड एमआयडीसीतील बंद कारखाना फोडून चोरटयांनी कारखान्यातील 1 लाख 13 हजार 900 रुपयांच्या विविध मशिनरी व साहित्यांची चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एक्सलंट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज (प्लॉट नंबर डब्ल्यू -76) या बंद कारखान्याच्या शटरचे कुलूप तोडून चोरटय़ांनी साहित्यांची चोरी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत रोहिणी किशोर पटवर्धन (रा. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरटय़ांना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश त्यांनी कुपवाड पोलिसांना दिले.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुपवाड एमआयडीसीत पोलीस ठाण्यालगतच रोहिणी पटवर्धन यांची एक्सलंट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे. ही कंपनी 16 मे 2022 ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बंद होती. अज्ञात चोरटय़ांनी कंपनी बंद असल्याचे पाहून कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून कंपनीच्या आत प्रवेश केला आणि कारखान्यातील मशिनरी व साहित्याची चोरी केली.
यामध्ये कंपनीतील 10 हॅड्रोलिक व 11 न्युमॅटीक असे 21 सिलेंडर, डीलींग स्टूलचे 70 नग, 7 प्लॅट स्किन मॉनिटर, 3 प्रिंटर, मेटल क्रिपचे 50 नग, स्टील बेअरींग 50 नग, टुल्स धार मशीन 3 नग, टॉगल क्लॅम्स बॉक्स 50 नग असे एकूण 1 लाख 13 हजार 900 रुपयांच्या विविध मशिनरी साहित्यांची चोरी झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याबाबत माहिती मिळताच रोहिणी पटवर्धन यांनी गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.