भारतीय अनुभवी विकेटकीपर आणि आघाडीचा फलंदाज दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिनेश कार्तिकची एक इंस्टाग्राम पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. खुद्द कार्तिकने इंस्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं असं काय म्हटलं आहे, की तो क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
टी- 20 वर्ल्डकपनंतर अनेक वरिष्ठ क्रिकेटपटू संन्यास घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच बुधवारी दिनेश कार्तिकने एक इंस्टाग्राम पोस्ट केली, त्यावरून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) च्या प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात मदत केल्यानंतर दिनेश कार्तिकने मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्याचं त्याचं ‘स्वप्न’ होतं. त्यामुळेच कदाचित कार्तिकने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे संकेत दिले असावे, असे देखील बोललं जात आहे. दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीत त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
दिनेश कार्तिकने ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याच्या अनुभावाचा देखील आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचं आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आल्याबाबत, त्याने खंत देखील व्यक्त केली आहे.
काय म्हणाला कार्तिक…
‘टीम इंडियाकडून वर्ल्डकप खेळणे माझ्यासाठी मोठे सन्मानाचं आहे. पण, आम्ही सर्व आमच्या ध्येयांमध्ये कमी पडलो. मात्र, त्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण आले. सहकारी क्रिकेटपटू, प्रशिक्षक, मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी मला खूप पाठिंबा दिला त्या चाहत्यांचे आभार.’ #DreamsDoComeTrue #T20WorldCup’ तसेच आपल्या पोस्टसोबत कार्तिकने ऑस्ट्रेलिया दौऱ्यांचा एक मोन्टाज देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिकसोबत त्याचे सहकारी आहेत.
दरम्यान, टी-20 वर्ल्डकप 2022 च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड संघाकडून टीम इंडियाचा दारुण पराभव झाला होता. इंग्लंडने 10 गडी राखून टीम इंडियावर विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र, हा विश्वचषकमध्ये दिनेश कार्तिकला विशेष असं काही करण्याची संधी मिळाली नाही. टीममध्ये एक फिनिशर म्हणून त्याची निवड झाली होती. ऋषभ पंतच्या जागेवर कार्तिकला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली होती. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीत कार्तिकने केवळ एकच धाव काढण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कार्तिकने 6 धावा केल्या होत्या. तर बांग्लादेशविरुद्धच्या लढतीत त्याने केवळ 7 धावांचे योगदान दिले होते.