गेल्या 22 दिवसांपासून सुरु असलेल्या अग्निवीर भरती मेळाव्यात कोल्हापुरात95 हजार उमेदवारांची चाचणी करण्यात आली.राज्यतील विविद भागांसह कर्नाटक आणि गोव्यातील तरुणांनी हजेरी लावली. शारीरिक, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी दिली जाणार आहे. आज भरतीचा अखेरचा दिवस आहे. केंद्र सरकारने अग्निवीर भरतीची योजना कार्यान्वित केल्यानंतर पहिल्यांदाच भरती प्रक्रिया होत आहे. 21 नोव्हेंबरपासून भरतीला सुरुवात झाली.
या भरतीसाठी 98 हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. राज्यातील सर्व भागांतून तरुण आले होते. दररोज पाच ते सहा हजार तरुणांची शारीरिक चाचणी होत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी केली जात होती. आता वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. निवड झालेल्यांना संपर्क करून त्यांना याबाबतच्या पुढील सूचना देण्यात येणार आहेत.
स्टेरॉईड संदर्भात चौकशी
दरम्यान, कोल्हापुरातहोत असलेल्या अग्निवीर भरती मेळावा स्टेरॉईडच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. दोन तरुण ओव्हरडोस होऊन बेशुद्ध झाल्याची घटना घडल्या. स्टेरॉईड घेतल्याने जास्त क्षमतेने पळता येत असल्याने अनेकांनी हा अवैध मार्ग पकडल्याचेही दिसून आले. मात्र, स्टेरॉईड घेणे हा गुन्हा आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लष्करातील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी सिरिंज आढळून आल्या त्या जागेची पाहणी पोलिसांनी केली आहे. उत्तेजक द्रव्ये देणाऱ्यांचे रॅकेट आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
भरतीला आलेली तरुण 17 ते 21 वयोगटातील असल्याने भरती प्रक्रियेत अपयश आल्यास त्यांना निराशा वाटू नये, यासाठी पोलिसांकडून समुपदेशनही करण्यात आले होते. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुढाकार घेतला होता. भरती प्रक्रियेत अपयश आल्याने शिरोलीत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटनाही घडली.
भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी
दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच महिलांना कमांडो म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच महिलांना लष्करामध्ये कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, लवकरच यासंबंधित ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे.